जळगाव समाचार | १५ नोव्हेंबर २०२५
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे माजी आमदार शिरीष चौधरी यांचे वडील तथा अखिल भारतीय तैलीक महासभेचे प्रांतीय उपाध्यक्ष हिरालाल मगन चौधरी (८७) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल भागातून समाजकारण, राजकारण, व्यापार या सर्वच क्षेत्रांत कार्यरत राहून त्यांनी आपली स्वतंत्र छाप उमटवली होती. चार ते पाच दिवसांपासून प्रकृती खालावल्याने त्यांना नंदुरबार येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले.
नंदुरबार नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून सेवा बजावताना तसेच सहकार क्षेत्रात शालेय संकुल, पतसंस्था उभारण्यापासून ते दुग्ध व हॉटेल व्यवसायात मोठे योगदान देत त्यांनी बहुआयामी कार्याची परंपरा निर्माण केली. नंदुरबारमधील ज्येष्ठ नेते पी. के. अण्णा पाटील यांच्या प्रभावाखाली राजकारणात सक्रिय झालेल्या हिरालाल चौधरी यांनी आपल्या मुलाला—शिरीष चौधरी—यांना अंमळनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्यास प्रवृत्त केले होते आणि त्यांना विजय मिळवून देण्यातही मोठी भूमिका बजावली होती.
हिरालाल चौधरी यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांची मुलगी रेखा चौधरी आरोग्य व सौंदर्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त व्यक्ती असून, पत्नी इंदुबाई चौधरी नगराध्यक्ष असताना नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली होती. शनिवारी दुपारी सहकार महर्षी पी. के. पटील महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांचे अंत्यसंस्कार पार पडणार असून त्यांच्या निधनाने तैलीक समाजासह नंदुरबारच्या सामाजिक-राजकीय क्षेत्रातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

![]()




