निकोलस पूरनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धक्कादायक निवृत्ती; वयाच्या २९ व्या वर्षी घेतला मोठा निर्णय…


जळगाव समाचार | १० जून २०२५

मागील काही दिवसांपासून विविध देशांतील मोठ्या क्रिकेटपटूंनी निवृत्तीची घोषणा केली असताना, आता वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज निकोलस पूरन याने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्याची घोषणा केली आहे. अवघ्या २९ व्या वर्षी निवृत्ती घेतलेल्या पूरनने ही बातमी सोमवारी (१० जून) आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली.

“खूप विचार आणि चिंतन केल्यानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या खेळाने मला खूप आनंद दिला, अविस्मरणीय आठवणी दिल्या आणि वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. मरून रंगाची जर्सी घालणे, राष्ट्रगीतासाठी उभं राहणे आणि संघाचे नेतृत्व करणे, हे सगळं माझ्या आयुष्यातले सर्वोच्च क्षण होते,” अशी भावना पूरनने आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केली. त्याने चाहत्यांचे, कुटुंबाचे आणि सहकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानले आणि वेस्ट इंडिज क्रिकेटवरील प्रेम कधीही कमी होणार नसल्याचे स्पष्ट केले.

निकोलस पूरनने वेस्ट इंडिजसाठी ६१ एकदिवसीय सामने खेळत १९८३ धावा केल्या. त्याची सरासरी ३९.६६ इतकी होती. त्याने वन-डेमध्ये तीन शतके आणि अकरा अर्धशतके झळकावली. तसेच, सहा विकेट्सही घेतल्या. तर, त्याने १०६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळत २२७५ धावा केल्या असून त्याची सरासरी २६.१५ आणि स्ट्राईक रेट १३६.४० इतका आहे. त्याने टी-२० मध्ये तेरा अर्धशतके झळकावली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये मात्र त्याने कधीही पदार्पण केले नव्हते.

पूरनने निवृत्तीचे स्पष्ट कारण जाहीर केले नसले, तरी क्रिकेट विश्लेषकांचे मत आहे की, तो आता पूर्णवेळ T20 लीगमध्ये सहभागी होणार आहे. वेस्ट इंडिजचे ड्वेन ब्राव्हो, ख्रिस गेल, आंद्रे रसेल आणि सुनील नारायण यांसारख्या खेळाडूंनीदेखील अशाच पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन जगभरातील विविध टी-२० लीगमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे.

सध्या निकोलस पूरन T20 क्रिकेटमधील आघाडीचा फलंदाज मानला जात असून अनेक फ्रँचायझी संघ त्याला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी उत्सुक आहेत. त्याच्या या निर्णयामुळे वेस्ट इंडिज संघात निश्चितच एक मोठी पोकळी निर्माण होणार असली तरी, पूरनचा T20 प्रवास आता नव्या उंचीवर पोहोचण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here