जळगाव समाचार | ९ मे २०२५
व्हॅटिकन सिटीमध्ये आज पांढऱ्या धुरासोबत नवा पोप निवडल्याची घोषणा झाली. अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट हे कॅथोलिक चर्चचे २६७ वे पोप बनले असून त्यांना पोप लिओ चौदावा म्हणून ओळखले जाणार आहे.
या निवडीनंतर ते सेंट पीटर बॅसिलिकाच्या बाल्कनीत आले आणि हजारो लोकांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या निवडीची घोषणा फ्रान्सचे कार्डिनल डोमिनिक मॅम्बर्टी यांनी केली.
६९ वर्षीय प्रीव्होस्ट हे मूळचे शिकागोचे असून त्यांनी पेरूमध्ये मिशनरी म्हणून अनेक वर्ष सेवा केली आहे. २०२३ मध्ये त्यांना कार्डिनल बनवण्यात आले होते.
पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर ही निवड झाली आहे. पोप फ्रान्सिस यांनी तब्बल १२ वर्षे कॅथोलिक चर्चचे नेतृत्व केले.
पोप निवडीची प्रक्रिया कशी असते?
पोप निवडण्यासाठी “कॉन्क्लेव्ह” नावाची विशेष बैठक होते. सिस्टिन चॅपलमध्ये ८० वर्षांखालील कार्डिनल्स गुप्त मतदान करतात. जर कोणत्याही उमेदवाराला आवश्यक दोन तृतीयांश मते मिळाली नाहीत, तर मतपत्रिका जाळल्या जातात आणि काळा धूर बाहेर येतो. मात्र जेव्हा एखाद्या उमेदवाराला आवश्यक मते मिळतात, तेव्हा पांढरा धूर बाहेर येतो आणि जगाला नवे पोप मिळाल्याचे संकेत मिळतात.
आज सकाळी व्हॅटिकनच्या चिमणीतून पांढरा धूर दिसला आणि संपूर्ण जगाचे लक्ष पुन्हा एकदा व्हॅटिकनकडे वळले.

![]()




