न्यू इंडिया को-ऑपरेटिव बँकेत १२२ कोटींचा घोटाळा; माजी महाव्यवस्थापकावर गुन्हा दाखल…

जळगाव समाचार | १५ फेब्रुवारी २०२५

महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव बँकेमध्ये तब्बल १२२ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश प्रवीणचंद मेहता यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. दादर आणि गोरेगाव शाखांतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हितेश मेहता यांनी महाव्यवस्थापक असताना बँकेच्या तिजोरीतून १२२ कोटी रुपये गैरव्यवहार करून काढल्याचा आरोप आहे. ही बाब उघड झाल्यानंतर बँकेच्या मुख्य लेखा अधिकाऱ्याने दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानुसार पोलीसांनी गुन्हा नोंदवला.

२०२० ते २०२५ दरम्यान झाला घोटाळा

पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा घोटाळा २०२० ते २०२५ दरम्यान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आणखी एक व्यक्ती सामील असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे सखोल चौकशीसाठी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) सोपवण्यात आले आहे.

RBI ची बँकेवर कारवाई

या प्रकरणानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने न्यू इंडिया को-ऑपरेटिव बँकेवर कारवाई केली आहे. बँक अधिकाऱ्यांनी पैशांची हेराफेरी केल्याचा ठपका ठेवत RBI ने बँकेच्या खात्यांची तपासणी केली असता अनेक अनियमितता आढळल्या.

१.३ लाख ठेवीदारांवर परिणाम होण्याची शक्यता

मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव बँकेचे १.३ लाख ठेवीदार आहेत. यापैकी ९० टक्के ठेवीदारांचे खाते ५ लाख रुपयांच्या आत असल्याने ते ठेवी विमा योजनेद्वारे त्यांचे पैसे मिळवू शकतात. मात्र, मोठ्या ठेवी असलेल्या खातेदारांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

RBI कडून केलेल्या चौकशीत बँकेतील काही कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर निधीचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. या आर्थिक घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा (EOW) करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here