जळगाव समाचार | १ सप्टेंबर २०२५
जुना महामार्ग अंधारात बुडालेला असतानाच पाळधी–तरसोद बाह्यवळण महामार्गावर सुरू झालेली नवी प्रकाशयोजना वाहनधारकांसाठी दिलासादायक ठरत आहे. काही भागातील पथदिवे कार्यान्वित झाल्याने रात्रीचा प्रवास सुरक्षित व सुखकर होत आहे. त्यामुळे महामार्गालगतचा परिसर आकर्षक भासत असून शहराच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. विशेषतः या मार्गामुळे शहराचा विस्तार उत्तरेकडे होण्यास चालना मिळाली असून, रिअल इस्टेट क्षेत्राचेही या भागाकडे लक्ष वेधले गेले आहे. शिवाय समृद्धी महामार्गाशी जोडणीच्या हालचालींमुळे भविष्यातील प्रगतीला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे.
या बाह्यवळण महामार्गालगतच्या गावांमध्ये औद्योगिकरणासाठी मोठी संधी असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. पाळधी, बांभोरी, आव्हाणे, ममुराबाद, आसोदा आदी भागातील तरुण व शेतकरी कृषी आधारित प्रक्रिया उद्योग, सोलर प्रकल्प, आयटी पार्क आणि अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यास उत्सुक आहेत. शासनाच्या २०२३ च्या औद्योगिक धोरणानुसार या भागाला ‘डी प्लस’ दर्जा मिळाल्यास अनेक उद्योग उभे राहू शकतील. आमदार सुरेश भोळे यांनीही या महामार्गालगत औद्योगिक वसाहतीसाठी आवश्यक सुविधा द्याव्यात, अशी मागणी शासनाकडे केली आहे. या मागणीची अंमलबजावणी झाल्यास रोजगाराच्या संधी वाढून बेरोजगारांचे स्थलांतर थांबेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.