मुक्ताईनगर येथे रा.काँ. शरदचंद्र पवार पक्षातर्फ़े महायुतीचे काळे कारनामे पुस्तिकेचे वितरण…

 

जळगाव समाचार डेस्क | २९ ऑगस्ट २०२४

 

महायुती सरकारने राज्यातील शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्याचा दावा केला जात असला, तरी या योजना अपयशी ठरल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. या सरकारच्या काळात सहकार क्षेत्र, कर्जमाफी, पिकांचा हमीभाव, पीक विमा, दुध अनुदान, बळीराजाच्या आत्महत्या, सोयाबीन, कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती महागाई, रोजगार, आणि महिला सुरक्षा या सर्वच स्तरावर अपयश आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, महापुरुषांचा अवमान होत असल्याचाही निषेध व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने मुक्ताईनगर येथे या अपयशाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आणि माजी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी केले.
‘महायुतीचे काळे कारनामे’ पुस्तिकेचे वितरण:
या आंदोलनादरम्यान, महायुती सरकारच्या अपयशाचा लेखाजोखा मांडणाऱ्या ‘महायुतीचे काळे कारनामे’ या पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. तसेच, आकाशात काळे फुगे सोडून महायुती सरकारचा निषेध करण्यात आला.
रोहिणी खडसे यांचे मार्गदर्शन:
उपस्थितांना मार्गदर्शन करताना रोहिणी खडसे म्हणाल्या, “गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने महाराष्ट्राची अवहेलना करून महाराष्ट्राला झुकवण्याचे काम केले आहे. राज्यातील महायुती सरकारने राज्याची अस्मिता केंद्र सरकारकडे गहाण ठेवण्याचे पातक केले आहे. सत्ताधाऱ्यांनी महागाई आटोक्यात आणण्याचे, रोजगार देण्याचे, शेतमालाला हमीभाव देण्याचे, महिलांना सुरक्षित वातावरण देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु केंद्र व राज्य सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीत भ्रष्टाचार करून पुतळा कोसळला आहे, त्यामुळे छत्रपतींचा अवमान झाला आहे. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांची मान शरमेने खाली गेली आहे. सत्ताधाऱ्यांना जनसामान्यांच्या प्रश्नांशी काहीही देणे-घेणे नाही. यांना धडा शिकवण्याची वेळ आली असून जनता त्यांना नक्कीच धडा शिकवेल.” रोहिणी खडसे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना महायुती सरकारचे काळे कारनामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
रविंद्र पाटील यांची कठोर टीका:
माजी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी महायुती सरकारच्या कारभारावर कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र विरोधी भूमिका घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचण्याचे आवाहन केले. यावेळी मनोहर खैरनार यांनी राज्य केंद्र सरकारच्या कारभारावर टीकास्त्र डागले.
आंदोलनात प्रमुख नेत्यांचा सहभाग:
या आंदोलनात उ बा ठा गटाचे मनोहर खैरनार, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, माजी सभापती निवृत्ती पाटिल, दिलीप पाटिल,विलास धायडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, लता सावकारे, भागवत पाटिल, प्रेमचंद बढे, अनिल पाटील, प्रविण पाटिल, बापु ससाणे, संजय कोळी, साहेबराव पाटिल, सोनु पाटिल, प्रविण दामोदरे, विनोद काटे, नंदकिशोर हिरोळे, योगेश काळे, राहुल पाटील, निलेश भालेराव,भुषण पाटील, रउफ खान, अज्जू खान,सय्यद फिरोज, जितेंद्र पाटिल,सुभाष खाटीक,रफिक मिस्त्री,हरि कवळे,भैय्या पाटील,बाळा चिंचोले आणि पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here