राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी कल्पिता पाटील यांची नियुक्ती

 

जळगाव समाचार | ९ फेब्रुवारी २०२६

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष संघटन बळकटीच्या दृष्टीने सातत्याने महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना, जळगाव जिल्ह्यातील पक्षकार्याला नवी दिशा देणारी महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने कल्पिता पाटील यांची जळगाव ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र जारी करण्यात आले असून, ही नियुक्ती दि. ५ फेब्रुवारी रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.

कल्पिता पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकनिष्ठ, सक्रिय आणि अभ्यासू कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात युवती काँग्रेसच्या माध्यमातून केली असून, विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत पक्षसंघटनेत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे, २०१३ मध्ये कल्याणेहोळ गावच्या सरपंचपदी निवडून येत त्या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या सरपंच ठरल्या होत्या. त्यांच्या कार्यकाळात गावविकास, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक प्रश्नांवर प्रभावी काम झाले. तसेच २०१६ मध्ये दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेत भारतातून निवड झालेल्या पाच प्रतिनिधींमध्ये त्यांचा समावेश होता.

ग्रामीण भागात पक्षवाढीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक काम केले असून, विविध आंदोलने, निदर्शने आणि लोकशाही मार्गाने करण्यात आलेल्या संघर्षांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. शेतकरी व सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याची त्यांची भूमिका नेहमीच ठळक राहिली आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून त्यांनी आंदोलन केले होते. नियुक्तीपत्रात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे, महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना अधिक मजबूत करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जळगाव ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त होत असून, सर्व स्तरांतून कल्पिता पाटील यांचे अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here