जळगाव समाचार | २९ एप्रिल २०२५
जळगाव जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसणार आहे. पक्षाचे प्रमुख नेते आणि माजी मंत्री डॉ. सतीश पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.
२ मे रोजी मुंबई येथे डॉ. सतीश पाटील यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार असून, त्यासाठी त्यांनी पारोळा व एरंडोल तालुक्यातील कार्यकर्त्यांची मंगळवारी बैठक बोलावली आहे. दरम्यान, गुलाबराव देवकर यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त मंगळवारी ठरणार असून त्यासाठी जिल्हा बँकेत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, माजी आमदार कैलास पाटील, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका तिल्लोतमा पाटील तसेच शरद पवार गटातील काही पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत देवकर यांचा प्रवेश निश्चित होण्याची शक्यता आहे.
जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी यापूर्वीच जाहीर केले होते की, दोन माजी मंत्री, दोन माजी आमदार आणि इतर काही मोठे पदाधिकारी लवकरच शरद पवार गटातून बाहेर पडून अजित पवार गटात सामील होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
पक्षप्रवेशासंदर्भात अंतिम निर्णय माजी मंत्री अनिल पाटील घेणार असून, अजित पवार यांची वेळ घेऊन अधिकृत घोषणा केली जाईल, असेही संजय पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, डॉ. सतीश पाटील यांनी स्वतः आपल्या प्रवेशाची पुष्टी दिली असून, “२ मे रोजी मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत आम्ही पक्षप्रवेश करणार आहोत,” असे त्यांनी म्हटले.
गुलाबराव देवकर यांनी देखील, “प्रवेश निश्चित आहे, फक्त तारीख मंगळवारीच्या बैठकीनंतर ठरवली जाईल,” असे सांगत अजित पवार गटात येण्याची तयारी दर्शवली आहे.
या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात अजित पवार गटाचे बळ वाढणार असून, स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांचा प्रभाव अधिक मजबूत होण्याची चिन्हे आहेत.