जळगाव समाचार | ३१ जानेवारी २०२६
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. शनिवारी विधान भवनात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत हा ठराव संमत करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर पक्षात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी हे पद अधिक काळ रिक्त न ठेवता तातडीने निर्णय घेण्यात आला. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हालचाली करत विधिमंडळ गटनेतेपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
शुक्रवारी रात्री उशीरा सुनेत्रा पवार व जय पवार हे बारामतीहून मुंबईकडे रवाना झाले होते. शनिवारी सकाळी देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे व प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. याच ठिकाणी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. जनभावना आणि पक्षातील एकसंघ भूमिका लक्षात घेऊन या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमत झाले. त्यानंतर सर्व नेते विधान भवनात पोहोचले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात अजित पवार यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्यानंतर विधिमंडळ सदस्यांची बैठक सुरू झाली.
या बैठकीस पक्षाचे विधानसभा व विधान परिषद सदस्य उपस्थित होते. तसेच सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांचीही उपस्थिती होती. बैठकीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सूचक म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, त्यास दोन आमदारांनी अनुमोदन दिले. त्यानंतर अधिकृतपणे सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड जाहीर करण्यात आली. या निर्णयाची माहिती देणारे पत्र विधिमंडळ सचिव तसेच मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार आहे. विधिमंडळ गटनेतेपद हे पक्षाच्या प्रशासकीय व संसदीय कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
दरम्यान, सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून संध्याकाळी लोकभवनात साध्या पद्धतीने शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सहा महिन्यांच्या आत त्यांना विधानसभे किंवा विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची अट पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा आधीच दिला आहे. पुढील सहा महिन्यांत पोटनिवडणुकीद्वारे विधिमंडळ सदस्य होणे त्यांच्यासाठी आवश्यक ठरणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील दिशा, धोरणे आणि वाटचाल ठरवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्यावर येऊन ठेपली आहे.

![]()




