जळगाव समाचार डेस्क| ११ ऑक्टोबर २०२४
नवरात्रीचा उत्सव सध्या राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने अनेक ठिकाणी गरबा, दांडिया आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नवरात्रीच्या शेवटच्या तीन दिवसांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर व ध्वनीवर्धक वापरण्यास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी परवानगी दिली आहे.
दिनांक १०, ११, आणि १२ ऑक्टोबर या तीन दिवसांमध्ये रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वापराची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक प्रसिद्ध करत आदेश जारी केले आहेत.
ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 चे नियम 53 नुसार, जळगाव जिल्ह्यात नवरात्री उत्सवासाठी १० ते १२ ऑक्टोबर दरम्यान रात्री १० ते १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक वापरण्यास सूट देण्यात आली आहे. तसेच, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.