जळगाव समाचार डेस्क;
माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah Minister of Home Affairs of India) यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्या सोबत खडसे यांच्या स्नुषा आणि केंद्रीय राज्यमंत्री खा. रक्षाताई खडसे (Raksha Khadse) या देखील उपस्थित होत्या. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून भाजप मधील त्यांचा रखडलेला प्रवेश हा लवकरच होण्याची दात शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी ऐनवेळी तब्येतीचे कारण देत राष्ट्रवादीतर्फे निवडणुकीत उतरण्यास नकार दिला होता. आणि त्यातच त्यांनी घरवापसी बद्दल बोलत भाजपचा प्रचार केला होता. तेव्हापासूनच सर्वांना त्यांचा पक्षप्रवेश नेमका कधी होणार याकडे लक्ष लागून आहे. त्याच पार्श्वभूमीवर आ. एकनाथराव खडसे यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाला असून या माध्यमातून त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार असल्याचे संकेत स्पष्ट झाले आहे.
पक्ष बांधणीपासून खडसे भाजप सोबत होते…
पक्षाच्या अगदी सुरुवातीपासून एकनाथराव खडसे हे भाजपचे प्रचारक आणि प्रसारक म्हणून ते काम करीत होते. मात्र २०१४ नंतर त्यांच्यावर झालेल्या अनेक आरोपांमुळे ते मंत्री मंडळातून बाहेर पडले. त्यात त्यांचे इतर सहकार्यांसह वाद चव्हाट्यावर येऊ लागले होते. त्यामुळे त्यांची नाराजी वाढली आणि त्यांनी अलीकडच्या काळात राष्ट्रवादीचा हात धरला होता. मात्र ऐन लोकसभेच्या तोंडावर त्यांनी पुन्हा भाजप प्रवेशाचे वक्तव्य केले. तेव्हापासून सर्वांनाच त्यांच्या प्रवेशाची प्रतीक्षा आहे. दरम्यान आता नाथाभाऊ पुन्हा भाजपमध्ये परतल्यास उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी पक्षाची ताकद वाढणार आहे हे मात्र निश्चित आहे.