जळगाव समाचार | ३१ मार्च २०२५
नशिराबाद येथील उड्डाणपुलावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने गाडी थंड दुभाजकावर धडकून एक २३ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. अपघातात चैतन्य फेगडे (वय २३, रा. निंभोरा, ता. रावेर) याचा मृत्यू झाला, तर त्याचा जुळा भाऊ चेतन फेगडे गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चैतन्य आणि चेतन हे दोघे जुळेभाऊ आपल्या आई-वडिलांसोबत घरकुल योजनेच्या कामासाठी जळगावला जात होते. त्यांचे वडील रिक्षाने पुढे गेले, तर दोघे भाऊ दुचाकी (MH 19 EE 1702) घेऊन निघाले. नशिराबाद उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीवरील ताबा सुटल्याने ती दुभाजकाला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, चैतन्यचा जागीच मृत्यू झाला.
गंभीर जखमी झालेल्या चेतनला तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
मयत चैतन्य हा एक वर्षापूर्वी रेल्वे विभागात नोकरीला लागला होता. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे फेगडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
या अपघाताची नोंद नशिराबाद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.