जळगाव समाचार | २६ जानेवारी २०२६
प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक येथे आयोजित शासकीय ध्वजारोहण समारंभात आज एक अनपेक्षित आणि खळबळजनक घटना घडली. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे भाषण सुरू असताना, वनविभागातील महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी थेट व्यासपीठाच्या दिशेने धाव घेत भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न केल्याबद्दल जाब विचारला. या प्रकारामुळे काही काळ कार्यक्रमस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत माधवी जाधव यांना तातडीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतरही माधवी जाधव यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. “ज्यांनी देशाला संविधान दिलं, लोकशाहीची चौकट उभी केली, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात न घेणं ही गंभीर चूक आहे. मला सस्पेंड केलं, कामावरून काढलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही. बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही,” असे त्या म्हणाल्या. संविधान आणि लोकशाहीचा खरा मानकरी असलेल्या बाबासाहेबांचे नाव भाषणात नसल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या घटनेनंतर निर्माण झालेल्या चर्चेवर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अनावधानाने राहिले असावे. माझा तसा कोणताही हेतू नव्हता. माझी मागील भाषणे पाहिली तर असे कधी घडलेले नाही. यावेळी चुकून राहिले असेल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

![]()




