जळगाव समाचार | ७ एप्रिल २०२५
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सोनांबे गावात एका नवऱ्याने पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केदार हंडोरे या तरुणाने स्वत:ला पेटवून घेतलं आणि पत्नी व सासूच्या अंगावर जाऊन झोपून त्यांनाही जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तिघेही गंभीररित्या भाजले गेले असून त्यांच्यावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहल शिंदे (वय १९) ही आपल्या आई अनिता शिंदे यांच्यासोबत सोनांबे गावात राहत होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास तिचा पती केदार हंडोरे अचानक घरात घुसला. त्याने आधी घर पेटवून दिलं आणि त्यानंतर स्वत:ला पेटवून घेत दोघींवर झोपून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला.
या घटनेत स्नेहल ५० टक्के, अनिता शिंदे ६५ टक्के तर केदार ७० टक्के भाजला आहे. तिघांचीही प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या क्रूर कृत्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या प्रकारामुळे संपूर्ण सिन्नर तालुका हादरला आहे.