आज मतमोजणीत स्पष्ट होणार उमेदवारांचे भवितव्य

 

जळगाव समाचार | २१ डिसेंबर २०२५

जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी तसेच काही प्रभागांमध्ये दि. २० रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी ६५.५८ टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे. एकूण ८ लाख ८१ हजार ५०८ मतदारांपैकी ५ लाख ७८ हजार ०६९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, आज १८ नगराध्यक्ष व ४६४ नगरसेवक पदांचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.

प्राप्त अधिकृत आकडेवारीनुसार एरंडोल नगरपरिषदेत जिल्ह्यात सर्वाधिक ७५.४९ टक्के मतदान झाले आहे. त्यापाठोपाठ रावेर (७४.७४ टक्के) आणि यावल (७३.१६ टक्के) येथे समाधानकारक मतदान नोंदले गेले. मात्र जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपरिषद असलेल्या भुसावळमध्ये सर्वात कमी म्हणजे ५५ टक्के मतदान झाले असून, या ठिकाणी निकालाबाबत विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

मतमोजणीसाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली असून जिल्ह्यात एकूण १६० मतमोजणी पथके नेमण्यात आली आहेत. संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया ११६ फेऱ्यांत पूर्ण होणार आहे. भुसावळमध्ये सर्वाधिक १५ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून, धरणगाव आणि रावेर येथे केवळ २ फेऱ्यांत मतमोजणी पूर्ण होणार आहे. मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

निवडणूक प्रक्रियेत जिल्ह्यात एकूण ९७७ मतदान केंद्रांचा समावेश होता. यावेळी १,५९० टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या असून १,०२४ कंट्रोल युनिट्स (CU) वापरण्यात आल्या. प्रमुख शहरांमधील मतदानाची टक्केवारी अमळनेर ६४.४८, चाळीसगाव ६२.५८, चोपडा ६७.९७, पाचोरा ६८.८२ आणि जामनेर ६०.६८ इतकी नोंदविण्यात आली आहे. आता मतमोजणीनंतर जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाची दिशा कोणती ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here