जळगाव समाचार | २९ मार्च २०२५
म्यानमार आणि थायलंडमध्ये शुक्रवारी ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला. या भूकंपात म्यानमारमध्ये ६९४ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, शेकडो लोक बेपत्ता आहेत. तसेच, १५०० हून अधिक जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. थायलंडमध्येही या भूकंपाचा फटका बसला असून, १० जणांचा मृत्यू झाला आहे.
चार वेळा भूकंपाचे धक्के
शुक्रवारी दिवसभरात चार वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी ११:५० वाजता ७.२ तीव्रतेचा पहिला धक्का बसला, त्यानंतर १२:०२ वाजता ७ तीव्रतेचा दुसरा धक्का आला. पुढे, तिसरा आणि चौथा भूकंप जमिनीखालील २२.५ किलोमीटर खोलीवर झाला. रात्री उशिरा ४.२ तीव्रतेचा आणखी एक धक्का बसला.
बँकॉकमध्ये मोठी हानी
थायलंडची राजधानी बँकॉक येथे या भूकंपाचा सर्वाधिक प्रभाव जाणवला. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून, एक ३० मजली इमारत कोसळून ९० मजूर ढिगाऱ्याखाली अडकले. म्यानमारमध्येही अनेक रस्ते उखडले असून, घरे आणि अपार्टमेंट कोसळल्याने हजारो लोक बेपत्ता आहेत.
अफगाणिस्तानासह सहा देशांना हादरे
या भूकंपानंतर शेजारील देशांमध्येही हादरे जाणवले. आज सकाळी ५:१६ वाजता अफगाणिस्तानात ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. तसेच, भारत, चीन, नेपाळसह सहा देशांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले.
आणीबाणी जाहीर
या संकटामुळे म्यानमारमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, थायलंडचे पंतप्रधान शिनावात्रा यांनी बँकॉकमध्ये आणीबाणी लागू केली. काही मेट्रो आणि लाईट रेल्वे सेवा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत.
भारताकडून मदतीचा हात
भारताने म्यानमारला मदतीचा हात पुढे केला आहे. हिंडन एअर फोर्स स्टेशनवरून भारतीय हवाई दलाच्या C-130J विमानाने १५ टन मदत साहित्य पाठवले आहे. यात तंबू, स्लीपिंग बॅग्ज, ब्लँकेट, तयार अन्न, पाणी शुद्धीकरण यंत्र, स्वच्छता किट, सौर दिवे, जनरेटर सेट आणि जीवनावश्यक औषधांचा समावेश आहे.
सध्या दोन्ही देशांमध्ये मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.