प्रेमप्रकरणातून जन्मलेल्या अर्भकाची हत्या; प्रेमीयुगुल अटकेत…

जळगाव समाचार | २५ मार्च २०२५

प्रेमप्रकरणातून जन्मलेल्या नवजात अर्भकाची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका प्रेमीयुगुलाला अटक केली आहे. 5 मार्च रोजी अंबडगट्टी येथे एका शेताजवळ अर्भकाचा मृतदेह आढळून आला होता. उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतर पोलिसांनी तपास करून रविवारी दोघांना अटक केली. महाबळेश्वर कामोजी (वय 31) आणि सिमरन माणिकभाई (वय 22, दोघेही रा. अंबडगट्टी) अशी आरोपींची नावे आहेत.

महाबळेश्वर आणि सिमरन गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. या दरम्यान सिमरन गर्भवती झाली, मात्र तिने हे कोणालाही कळू दिले नाही. 5 मार्च रोजी तिला प्रसूती सुरू झाली. यावेळी तिने व्हिडिओ कॉलद्वारे महाबळेश्वरकडून मार्गदर्शन घेत एकटीनेच बाथरूममध्ये बाळाला जन्म दिला. नाळ कापल्यानंतर बाळाचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून तिने त्याचे तोंड दाबले. यामुळे त्याचा गुदमरण्याने मृत्यू झाला.

नंतर तिने अर्भक एका पोत्यात भरून महाबळेश्वरला बोलावले. त्याने हे पोते गावाजवळील कचराकुंडीत फेकले. काही वेळाने पोलिसांना नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला आणि त्यांनी तपास सुरू केला.

उत्तरीय तपासणीत अर्भकाच्या डोक्याला मार लागल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांनी अधिक तपास केला असता, सिमरनने गुन्ह्याची कबुली दिली. सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र नंतर या प्रेमीयुगुलावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here