जळगाव समाचार | २१ मे २०२५
यवतमाळ जिल्ह्यातील चौसाळा जंगलात १५ मे रोजी एका अज्ञात युवकाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. शवविच्छेदनातून मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला मृताची ओळख पटली नव्हती, पण परिसरातील चर्चांवरून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली.
नंतर चौकशीतून उघड झाले की, मृत युवकाचे नाव शंतनू अरविंद देशमुख (वय ३२) असून, तो यवतमाळचा रहिवासी होता. पोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली — त्याचा खून त्याच्या पत्नीनेच केला होता. निधी शंतनू देशमुख (वय २३) ही सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलची मुख्याध्यापिका असून, तिनेच हा खून थंड डोक्याने आखलेल्या कटानुसार केला.
तिने विद्यार्थ्यांसाठी “UPSC मिशन २०३०” नावाचा ग्रुप तयार केला होता. त्यातून विद्यार्थ्यांवर प्रभाव टाकून त्यांना आपल्या पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरले. शंतनूला विष देऊन ठार मारल्यानंतर, निधीने तीन विद्यार्थ्यांची मदत घेतली. त्यांनी पहाटे २ वाजता मृतदेह साडी व ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून चौसाळा जंगलात पेटवून दिला.
या गुन्ह्याचे बिंग फुटू नये म्हणून निधीने शंतनूच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याच्या मित्रांशी चॅटिंग सुरू ठेवले. यामुळे तो जिवंत असल्याचा आभास निर्माण झाला. इतकंच नव्हे तर तिने शंतनूच्या मित्रांनी मिसिंगची तक्रार करू नये म्हणून त्यांना थेट पोलिस ठाण्यावरून परतही आणले.
दरम्यान, पोलिसांनी शंतनूच्या दारू पिणाऱ्या मित्रांवर संशय घेतला. चौकशीत एका मित्राकडे मिळालेल्या फोटोतील कपडे आणि मृतदेहाजवळ सापडलेला कापड यांची जुळणं झाली आणि सत्य बाहेर आले.
या प्रकरणामुळे यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडाली असून, प्रेमविवाहाचा असा भयंकर शेवट कुणाच्याही अंगावर शहारा आणणारा ठरला आहे.