जळगाव समाचार | ९ एप्रिल २०२५
जळगाव जिल्ह्यात खुनाच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच भडगाव तालुक्यातील बाळद खुर्द गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घराच्या वाटणीवरून वाद झाल्याने चिडलेल्या पित्याने आपल्या सख्ख्या मुलाचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला. या क्रूर कृत्यात भावानेही साथ दिली.
ही घटना मंगळवार, ८ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. बाळू राजेंद्र शिंदे (वय २६) याने घराच्या वाटणीत अधिक हिस्सा मागितल्याने कुटुंबात वाद झाला. वाद विकोपाला जाऊन त्याचा वडील राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ४८) आणि भाऊ भारत शिंदे (वय २२) यांनी बाळूवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर लाकडी दांडक्याने चेहरा व छातीवर वार करत त्याचा जागीच खून केला.
घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही आरोपींना अटक केली. पोलीस पाटील सुनिल लोटन पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के आणि पोलीस नाईक महेंद्र चव्हाण करत आहेत.