जळगाव समाचार | ५ मार्च २०२५
वरवंड (ता. दौंड) येथे लताबाई धावडे (वय 40) यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पोलिस तपासात हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झालेला नसून त्यांचा खून त्यांच्या पुतण्यानेच केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अनिल धावडे आणि त्याचा शेतमजूर सतीलाल मोरे यांना अटक केली आहे.
7 डिसेंबर 2024 रोजी दुपारी तीनच्या सुमारास वरवंड हद्दीतील दादा दिवेकर यांच्या शेतात लताबाई धावडे यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचा बनाव रचण्यात आला. घटनेनंतर गावकऱ्यांनी वन विभागावर टीका केली होती. लताबाई यांचा पुतण्या अनिल धावडे याने देखील “आम्हाला वन विभागाकडून न्याय व आर्थिक मदत मिळायला हवी,” अशी मागणी केली होती.
मात्र, काहींना या मृत्यूबाबत शंका असल्याने हा खून असू शकतो, अशी चर्चा गावात सुरू झाली. त्यानंतर वन विभाग आणि यवत पोलिस ठाण्याने या घटनेचा सखोल तपास सुरू केला.
लताबाई धावडे यांच्या मृतदेहाचे नमुने नागपूर येथील प्रादेशिक न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवण्यात आले. अहवालातून हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामुळे झालेला नसून, कोणीतरी डोके व तोंड दगडाने ठेचून खून केल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर पोलिसांनी धावडे कुटुंबीयांची कसून चौकशी केली असता, अनैतिक संबंधांच्या कारणावरून लताबाई धावडे यांचा खून त्यांच्या पुतण्या अनिल धावडे आणि त्याचा शेतमजूर सतीलाल मोरे यांनी केल्याचे उघड झाले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
या प्रकरणाचा तपास यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पी. एच. सपांगे करत आहेत. या घटनेची फिर्याद पोलिस उपनिरीक्षक सलीम गफूर शेख यांनी दिली आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव करून खून लपवण्याचा प्रयत्न केल्याने गावकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.