जळगाव शहर हादरले; जैनाबाद येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून…


जळगाव समाचार | २३ मार्च २०२६

शहरातील जैनाबाद परिसरात रविवारी घडलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात भीती आणि खळबळ निर्माण झाली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या या हल्ल्याने जळगाव शहर पुन्हा एकदा हादरले असून या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मृत तरुणाचे नाव नितीन नाना काळे (वय ३५, रा. जैनाबाद, जळगाव) असे असून तो आपल्या कुटुंबासह शहरात राहत होता. काही महिन्यांपूर्वी त्याला गोवा येथे कटलरीच्या दुकानात नोकरी मिळाल्याने तो तेथे कार्यरत होता. दरम्यान, न्यायालयातील तारखेच्या निमित्ताने तो चार दिवसांपूर्वी जळगाव येथे आला होता.

रविवारी दि. २२ मार्च रोजी दुपारी सुमारास जैनाबाद परिसरात नितीन काळे जात असताना संशयित आरोपी शाम तुकाराम सूर्यवंशी याने त्याच्याकडे पाचशे रुपयांची मागणी केली. मात्र पैसे नसल्याचे सांगताच आरोपी संतप्त झाला आणि त्याने धारदार शस्त्राने नितीन काळे याच्यावर वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

वैद्यकीय उपचार सुरू असतानाच सोमवारी दि. २३ मार्च रोजी पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास नितीन काळे याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये एकच आक्रोश उसळला. मृताच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, नितीन काळे आणि संशयित आरोपी शाम सूर्यवंशी यांच्यात यापूर्वीपासून वाद सुरू होता आणि त्यासंदर्भात न्यायालयात खटला प्रलंबित होता. या प्रकरणात तडजोडीच्या बहाण्याने आरोपीने नितीन याला विश्वासात घेतले, त्याला सोबत नेले आणि त्यानंतर त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे जैनाबाद परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here