जळगाव समाचार डेस्क| ११ ऑगस्ट २०२४
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घडत असलेल्या मारहाण आणि खुनाच्या घटनांमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एरंडोल तालुक्यातील सावदा प्र.चा या गावात एका २५ वर्षीय तरुणाचा खून झाल्याचे पहाटेच्या सुमारास उघडकीस आले आहे.
मृत युवकाचे नाव इंदल प्रकाश वाघ हा एरंडोल तालुक्यातील सावदा प्र.चा या गावात जुनी भिलाटी येथील रहिवासी आहे. वाघ हा दगड फोडण्याचे काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. काही दिवसांपासून त्याची पत्नी त्याच्या सोबत राहत नव्हती, आणि तो आपल्या परिवारासोबतच वास्तव्य करत होता. १० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता वाघ घरातून बाहेर पडला होता. मध्यरात्री बस स्थानकानजीक काही अनोळखी इसमांनी त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याचा खून केला. ही घटना पहाटे ५ वाजता उघडकीस आली.
सावदा गावाचे पोलीस पाटील पवार यांनी याबाबत धरणगाव पोलीस निरीक्षक पंकज देसले यांना कळवले. यावेळी धरणगाव प्रभारी एपीआय प्रशांत कंडारे, पोलीस हवालदार वसंत निकम, पोलीस शिपाई प्रदीप सोनवणे, मोहन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि मृतदेह जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला, जिथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सीएमओ निरंजन देशमुख यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे, आणि पोलिसांनी तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे.