जळगाव समाचार | २९ मार्च २०२५
धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथे पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. ही घटना २६ मार्चच्या मध्यरात्री घडली. या हल्ल्यात त्यांचा १० वर्षीय मुलगा जखमी झाला असून सुदैवाने तो बचावला आहे.
मृत महिलेचे नाव शीतल उर्फ आरती सोमनाथ सोनवणे (वय ३२) असून, आरोपी पतीचे नाव सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे आहे. या दाम्पत्याला एक १० वर्षांचा मुलगा आणि ७ वर्षांची मुलगी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ सोनवणे याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत असत. २६ मार्च रोजी मध्यरात्री तो झोपेत असलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करू लागला. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली, तर मुलगा सिंधू सोनवणे याच्या हातावरही कुऱ्हाडीचा घाव बसला.
दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान २७ मार्च रोजी मध्यरात्री शीतल सोनवणे यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी शीतल यांच्या भावाने भाऊसाहेब पवार यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार २८ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले, स.पो.नि. नीलेश वाघ, पो.उ.नि. संतोष पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. फॉरेन्सिक पथकानेही पुरावे गोळा केले आहेत. पुढील तपास पो.हे.कॉ. राजू पाटील करत आहेत.