जळगाव समाचार | १९ मार्च २०२६
जळगाव तालुक्यातील निमखेडी गावात कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर संतापलेल्या पतीने पत्नीवर लोखंडी विळ्याने वार करून तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार, १९ मार्च रोजी दुपारी सुमारे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर आरोपी पती स्वतःहून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दिपाली नितीन सोनवणे (वय २८, रा. निमखेडी ता. जळगाव) असे मयत महिलेचे नाव असून नितीन विजय सोनवणे (वय ३५) असे संशयित आरोपी पतीचे नाव आहे. दिपाली या आपल्या पती, दोन मुलं आणि एक मुलगी तसेच कुटुंबासह निमखेडी येथे राहत होत्या. आरोपी नितीन सोनवणे हा हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. गेल्या काही वर्षांपासून पतिपत्नीत कौटुंबिक वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेच्या दिवशी दुपारी पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद उफाळून आला. या वादाचे रूपांतर तीव्र भांडणात झाले. संतापाच्या भरात आरोपी नितीन सोनवणे याने घरातील लोखंडी विळा घेऊन पत्नी दिपाली यांच्या मानेवर आणि पोटावर वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी होऊन जागीच कोसळल्या. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
घटना घडल्यानंतर आरोपी नितीन सोनवणे हा थेट जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गेला आणि “मी माझ्या पत्नीचा खून केला, मला अटक करा” असे सांगत स्वतःहून शरण आला. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता दिपाली सोनवणे या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने गेल्या चार वर्षांपासून दोघांमध्ये सतत वाद होत होते. अनेक वेळा ते एकमेकांपासून विभक्तही राहत होते. दिपाली या काही वेळा घर सोडून जात असल्याने वाद अधिक तीव्र होत गेले होते. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेल्या वादातून ही दुर्दैवी घटना घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गुढीपाडव्याच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. मयत दिपाली यांच्या पश्चात दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार असून त्यांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण समाजमन सुन्न झाले असून कौटुंबिक वादाचे भयावह रूप पुन्हा एकदा समोर आले आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

![]()




