जळगाव समाचार | १७ मार्च २०२५
केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये एका तरुणाने नैराश्यातून कुटुंबातील पाच जणांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 23 वर्षीय अफान नावाच्या तरुणाने आपल्या धाकट्या भावासह प्रेयसी, आजी आणि नातेवाईकांची हत्या केली. त्यानंतर तो स्वतः पोलिस ठाण्यात पोहोचला आणि गुन्ह्याची कबुली दिली.
हत्या करण्यापूर्वी अफान आपल्या धाकट्या भावाला हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि त्याला आवडते जेवण दिले. भावाने आनंदाने जेवण केले, पण त्याला कल्पनाही नव्हती की काही वेळातच त्याचा भाऊ त्याची हत्या करणार आहे. घरी परतल्यानंतर अफानने भावाची हत्या केली. त्यानंतर त्याने प्रेयसीला घरी बोलावून तिचाही जीव घेतला.
यानंतर अफान आपल्या आजीकडे गेला आणि तिलाही ठार मारले. त्यानंतर तो आईकडे गेला आणि तिलाही संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने आईचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले असून ती गंभीर जखमी आहे.
त्यानंतर अफान एसएन पुरम येथे पोहोचला आणि आपल्या काका-काकूंची हत्या केली. पाच खून केल्यानंतर तो वेंजारामूडू पोलिस ठाण्यात गेला आणि “मी संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले” असे सांगून गप्प बसला.
पोलिस चौकशीत अफानने सांगितले की, त्याचा परदेशातील सुटे भागांचा व्यवसाय पूर्णतः बंद पडला होता. तो लाखो रुपयांच्या कर्जात बुडाला होता आणि कर्जदारांचा दबाव वाढत होता. त्यामुळे तो प्रचंड नैराश्यात गेला होता. आपल्या मृत्यूनंतर प्रेयसी एकटी पडेल म्हणून तिलाही संपवल्याचे त्याने सांगितले.
अफानने पोलिस ठाण्यात कबुली देतानाच स्वतः विष प्राशन केल्याचे सांगितले, त्यामुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली. त्याला तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच, तो मानसिक आजाराने ग्रस्त होता का? याचा तपास पोलीस करत आहेत.

![]()




