जळगावात शिवीगाळीच्या रागातून एकाचा दगडाने ठेचून खून; अल्पवयीन मुलासह एकाला अटक…

 

जळगाव समाचार | १७ फेब्रुवारी २०२६

खंडेराव नगर परिसरातील अमर वसंत सपकाळे (वय ४२, रा. खंडेराव नगर) यांचा दगडाने ठेचून निर्घृण खून झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सुरुवातीला रेल्वेची धडक लागून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता; मात्र पोलिसांच्या तपासात हा घातपात असल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथून जळगावात परतल्यानंतर अमर सपकाळे हे रात्री उशिरा खंडेराव नगराजवळील उड्डाणपुल परिसरात गेले होते. तेथे रेल्वे रुळांमधील मोकळ्या जागेत बसलेल्या दोन तरुणांना त्यांनी शिवीगाळ केल्याने वाद निर्माण झाला आणि त्याच रागातून एका तरुणाने त्यांच्या डोक्यात दगड फेकून मारल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

रविवारी सकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास अमर सपकाळे यांचा मृतदेह रेल्वे रुळांमध्ये आढळून आला. मृतदेहावर रेल्वे अपघातासदृश जखमा नसल्याने संशय बळावला. घटनास्थळी पंचनामा करताना मृतदेहापासून अंदाजे शंभर मीटर अंतरावर रक्ताने माखलेला दगड पोलिसांना आढळून आला. फॉरेन्सिक तपासणीत त्या दगडावरील रक्ताचे नमुने मृत अमर सपकाळे यांच्याशी जुळल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे रेल्वे अपघाताचा अंदाज फेटाळून हा खून असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि खबरींच्या मदतीने संशयितांचा माग काढण्यात आला. त्यानुसार बारावीची परीक्षा देणाऱ्या एका अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here