मुक्ताईनगरात नैसर्गिक आपत्तीभरपाईत लाखोंचा घोटाळा; कोतवालसह चौघे निलंबित, “सूत्रधार कोण?” शेतकऱ्यांचा सवाल

 

जळगाव समाचार | ११ नोव्हेंबर २०२५

मुक्ताईनगर तालुक्यात नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाईत लाखोंचा अपहार झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघड झाले असून महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. उचंदा गावातील कोतवालाला सहा दिवसांच्या पोलिस कोठडीत घेतल्यानंतर तपासाला वेग आला आणि गैरव्यवहाराचे नवे धागेदोरे समोर येऊ लागले. या प्रकरणात संबंधित दोन तलाठी आणि एका क्लर्कवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून शेतकरी वर्गात खरा सूत्रधार कोण, हा प्रश्न टोकदारपणे उपस्थित केला जात आहे.

या कारवाईसंदर्भात तहसीलदारांनी निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत विचारणा केली असता त्यांनी सावध भूमिका घेत “मी प्रस्ताव पाठवला आहे; पुढील माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडेच,” इतकेच सांगितले. जिल्हाधिकारी जळगाव यांनी मात्र अधिकृत पुष्टी देत कोतवाल राहुल रवींद्र सोनवणे, तलाठी महेंद्र राजेंद्र वंजारी, तलाठी कृष्णकुमार आर. ठाकूर आणि क्लर्क मोनीश बेंडाळे या चौघांना निलंबित केल्याचे स्पष्ट केले.

या गैरव्यवहाराचा प्रारंभिक धागा राजुरा आणि बोरखेडा गावांपूरता असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. मात्र तपास पुढे सरकल्यावर उचंदासह आणखी सहा गावांमध्येही भरपाई निधीच्या वितरणात गंभीर अनियमितता झाल्याचे उघड झाले. त्यामुळे या प्रकरणाचा व्याप वाढत असून गैरव्यवहार किती खोलवर रुजलेला आहे, याची शंका अधिक तीव्र झाली आहे.

नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने २४ कोटी २१ लाख ४९ हजार ६३० रुपयांची मदत मंजूर करून थेट १९ हजार २१६ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली होती. मात्र प्राथमिक चौकशीत काही शेतकऱ्यांची नावे अस्तित्वात नसतानाही भरपाई घेतल्याचे, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष क्षेत्रापेक्षा कमी दाखवून जास्त रकमेचा लाभ उचलल्याचे प्रकार उघड झाले. यामुळे लाखो रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आतापर्यंतच्या तपासात १३ लाख ४५ हजार रुपयांचा अपहार सिद्ध झाला असून आणखी चार गावांमध्ये बनावट लाभार्थी तयार करून निधी काढल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे गैरव्यवहाराची रक्कम ४० ते ५० लाखांच्या घरात जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे महसूल पोर्टलमधील तांत्रिक त्रुटीही अधोरेखित झाल्या असून पुढील चौकशीचा टप्पा निर्णायक ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here