मुक्ताई पालखी आगमन सोहळ्यात रोहिणी खडसे भक्तिरसात तल्लीन; महिला वारकऱ्यांसोबत खेळली फुगडी…

 

जळगाव समाचार डेस्क| १० ऑगस्ट २०२४

 

शतकोत्तर परंपरे प्रमाणे ब्रह्मचित्कला आदिशक्ती श्री. संत मुक्ताईच्या पादुका पालखी सोहळ्याने 18 जुन रोजी श्री क्षेत्र कोथळी येथुन आषाढी एकादशीनिमित्त भुवैकुंठ पंढरपूर येथे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत परमात्मा श्री. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी हजारो भाविक भक्त वारकरी बांधवांसोबत प्रस्थान केले होते. सहा जिल्ह्यांतुन 600 कि मीचा प्रवास, चंद्रभागेत स्नान करून आषाढी एकादशीला श्री.विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन, व इतर संतांच्या पालखी सोहळ्याची भेट घेऊन, 21 जुलैला परतीच्या प्रवासाला लागलेल्या ब्रह्मचित्कला आदिशक्ती श्री. संत मुक्ताईच्या पादुका पालखी सोहळ्याचे शुक्रवार संध्याकाळी श्री. क्षेत्र मुक्ताईनगर येथिल नविन मुक्ताई मंदिरात आगमन झाले.
शनिवारी मुक्ताई पालखी सोहळ्याचे नविन मुक्ताई मंदिर ते मुक्ताई अंतर्धान स्थळ कोथळी या मार्गावर भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या आगमन सोहळ्यानिमित्ताने आदिशक्ती मुक्ताईच्या स्वागतासाठी आणि दर्शनासाठी जळगाव,बुलडाणा जिल्हयासह मध्यप्रदेश येथुन टाळ, मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात वारकरी भाविक भक्तांनी उपस्थिती लावली. यावेळी पुरुष, महिला ,बालक या तीन गटात भव्य वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शेकडो दिंड्यांनी सहभाग घेतला, त्यामुळे संपूर्ण मुक्ताईनगर कोथळी परिसर हा टाळ मृदुंगाच्या गजरात आणि पांडुरंग, मुक्ताई च्या जयघोषात दुमदुमून गेला.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सकाळी महाप्रसादाच्या स्वयंपाक स्थळी भेट देऊन शिरा मिरचीची भाजी या महाप्रसाद निर्माणाच्या कार्यात सेवा बजावली व संत आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन घेऊन मुक्ताई चरणी महाप्रसादाचा नैवद्य अर्पण केला.
त्यानंतर त्यांनी दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन सर्व दिंड्यां मधील वारकरी भाविक भक्तां सोबत संवाद साधला, तसेच टाळ मृदुंगाच्या गजरात भजनात सहभागी होऊन उपस्थित महिला वारकऱ्यांसोबत पाऊली व फुगडी खेळून भक्तिरसात तल्लीन झाल्याच्या दिसुन आल्या. रोहिणी खडसे यांनी जे. ई .स्कुल मुक्ताईनगरच्या मुलींच्या लेझीम पथकातील मुलीं समवेत लेझीम खेळून त्यांना प्रोत्साहन दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयाजवळ पक्षातर्फे पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. सर्व भाविकांना दुधाचे वितरण करण्यात आले. तसेच रोहिणी खडसे यांच्यातर्फ़े सर्व वारकऱ्यांना पंचरत्न हरीपाठाच्या पुस्तकाचे वितरण करण्यात आले.
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या, आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेलेल्या आदिशक्ती मुक्ताई पादुका पालखी सोहळ्याचे श्री क्षेत्र मुक्ताईनगर कोथळी येथे आगमन झाले. परिसराचे श्रद्धास्थान भक्तीस्थान असलेल्या श्री संत आदिशक्ती मुक्ताईचे स्वागत करून दर्शन घेण्यासाठी भर पावसात सुद्धा हजारो भाविक भक्तांनी उपस्थिती लावली सर्व भाविकांचा उत्साह वाखाणण्याजोगा असुन, पंढरपूर गेलेल्या वारकरी भाविक भक्तांचे दर्शन होणे म्हणजे प्रत्यक्ष विठुरायचे दर्शन घेणे, अशी वारकरी संप्रदायात श्रध्दा आहे. या वारकरी भाविक भक्तांचे मुक्ताईनगर व पंचक्रोशीतील जनतेला सेवा करण्याचे भाग्य लाभते याबद्दल आम्ही भाग्यवान आहोत.
आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन घेऊन या हंगामात बळीराजाला चांगले पिक पाणी होऊन शेतमालाला योग्य भाव मिळावा व सर्वांच्या जीवनात सुख,समृद्धी लाभावी अशी श्री.संत मुक्ताई चरणी प्रार्थना केल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here