जळगाव समाचार | ४ मार्च २०२५
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.
सोमवारी रात्री देवगिरी बंगल्यावर देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनाम्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे मुंडे आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर करण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत होती. मात्र, अजित पवार यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला होता. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयानक फोटो समोर आल्यानंतर जनक्षोभ वाढल्याने अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्णय घेतला.