जळगाव समाचार डेस्क| १७ ऑगस्ट २०२४
महाराष्ट्राच्या गावागावात आणि खेड्यापाड्यात धावणारी एसटीची लालपरी आता नव्या लुकमध्ये दिसणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात नव्या लुकमध्ये २,२५० बसगाड्या समाविष्ट होणार आहेत. या नव्या रुपातील बसची पहिली झलक समोर आली आहे, ज्यामुळे प्रवाशांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
राज्यातील एसटी महामंडळाच्या बसगाड्या म्हणजेच लालपरी आता नव्या रुपात येणार असून या गाड्या अधिक आरामदायी आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहेत. नव्या रुपातील या बसगाड्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुखद बनवतील. ऑक्टोबर महिन्यात या नव्या बसगाड्यांपैकी पहिल्या ३०० गाड्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
अशोक लेलॅंड कंपनीच्या या बसगाड्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहेत. विशेष म्हणजे या २,२५० बसगाड्यांची फाईल मागील एक वर्षांपासून मुख्यमंत्री कार्यालयात प्रलंबित होती. मात्र, आता या बसगाड्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच त्या रस्त्यावर धावू लागतील. या नव्या बसगाड्यांसाठी राज्य सरकारने १,०१२ कोटी रूपये खर्च केले आहेत.
एसटी महामंडळाच्या या नव्या बसगाड्या अधिक आरामदायी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी डिझाइन केल्या आहेत. या गाड्यांमध्ये सुधारित आसने, स्वच्छता, आणि अधिक स्थिरता यावर विशेष भर दिला गेला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता लांबच्या प्रवासातही आरामदायी आणि सुखद अनुभव मिळेल.
महाराष्ट्राच्या जीवनवाहिनी असलेल्या लालपरीच्या नव्या लुकची झलक पाहून नागरिकांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील लोकांसाठी ही लालपरी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ती त्यांना दैनंदिन प्रवासासाठी एक महत्त्वाची सुविधा देते. त्यामुळे या नव्या लुकमध्ये लालपरी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या रस्त्यांवर आपली गरिमा टिकवून ठेवेल, असा विश्वास आहे.