जळगाव समाचार | १७ फेब्रुवारी २०२६
जळगाव शहरात सुरू असलेल्या मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेअंतर्गत पत्रकार बांधवांसाठी विशेष मैत्रीपूर्ण सामन्याचे आयोजन करण्यात आले. शहरातील सागर पार्क मैदानावर दुपारी हा सामना रंगला. प्रिंट मीडिया विरुद्ध इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा दोन संघांमध्ये झालेल्या या सामन्यात प्रिंट मीडिया संघाने ८० धावांचे लक्ष्य अवघ्या ६ षटकांत पूर्ण करत दिमाखदार विजय मिळवला. निर्धारित ८ षटकांच्या सामन्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया संघाने दिलेले ८० धावांचे आव्हान प्रिंट मीडिया संघाने संयमी फलंदाजीच्या जोरावर सहज पार केले.
या सामन्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया संघाकडून एबीपी माझाचे चंद्रशेखर नेवे, टीव्ही ९ मराठीचे किशोर पाटील, लोकशाहीचे सुमित देशमुख, एनडीटीव्ह मराठीचे मंगेश जोशी, झी २४ तासचे वाल्मीक जोशी, साम टीव्हीचे संजय महाजन, न्यूज १८ मराठीचे विजय वाघमारे, नितीन नांदुरकर, जुगल पाटील तसेच सचिन गोसावी यांनी सहभाग नोंदवला. तर प्रिंट मीडिया संघाकडून चेतन वाणी, पवन खंबायत, आकाश बाविस्कर, प्रवीण आढाव, विक्रम कापडणे, राकेश वाणी, भूषण हंसकर, सतीश सैंदाणे आणि वसीम खान यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. सामन्यादरम्यान खेळाडूंनी क्रीडाभावना जपत उत्साहपूर्ण वातावरणात खेळ सादर केला.
मराठा प्रीमियर लीगच्या आयोजकांनी पत्रकारांसाठी हा विशेष सामना आयोजित करून क्रीडा आणि पत्रकारिता यांचा सुंदर संगम घडवून आणला. व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून पत्रकार बांधवांना मैत्रीपूर्ण वातावरणात खेळण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. अशा उपक्रमांमुळे परस्परांतील स्नेह अधिक दृढ होत असून शहरातील क्रीडामय वातावरणालाही चालना मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

![]()




