जळगाव समाचार डेस्क। २७ ऑगस्ट २०२४
जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासनाने मोठी कारवाई करत तीन प्रमुख गुन्हेगारांना एम.पी.डी.ए. (महाराष्ट्र प्रिव्हेंटिव्ह डिटेंशन ऍक्ट) अंतर्गत स्थानबद्ध केले आहे. या तिघांवर जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्यांच्या गुन्हेगारी वर्तनात सुधारणा न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील आकाश उर्फ खंडया ठाकुर (वय २४, रा. तुकारामवाडी, जळगाव) याच्या विरोधात ७ गुन्हे नोंदवलेले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी २६ ऑगस्ट २०२४ रोजी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
यावल पोलीस स्टेशन हद्दीतील आकाश बिऱ्हाडे (वय २२, रा. सिध्दार्थ नगर, यावल) याच्या विरोधात १० गुन्हे नोंदवलेले आहेत. पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप ठाकुर यांच्या प्रस्तावानुसार, २६ ऑगस्ट रोजी मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहात त्याला स्थानबद्ध करण्यात आले.
फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रविण उर्फ डॉन तायडे (वय २८, रा. पाडळसा, ता. यावल) याच्या विरोधात १३ गुन्हे दाखल असून, फैजपूर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला अटक करून, २७ ऑगस्ट रोजी मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे जिल्ह्यात गुन्हेगारी वर्तनावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या कारवाईत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव व त्यांचे अधिनस्त पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ जयंत भानुदास चौधरी, पोहेकॉ रफिक शेख कालु, पोहेकॉ संदिप चव्हाण, पोकॉ ईश्वर पंडीत पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

![]()




