जळगाव समाचार | २९ एप्रिल २०२५
डहाणू शहरातील लोणीपाडा भागात एका हृदयद्रावक घटनेत, चौथे अपत्यही मुलगी झाल्याच्या दुःखातून एका आईने आपल्या नवजात चिमुरडीचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शनिवारी (२६ एप्रिल) मध्यरात्री डहाणू उपजिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूनम शहा (मूळ उत्तर प्रदेश, सध्या लोणीपाडा, डहाणू) ही महिला काही दिवसांपूर्वी घरच्या घरी प्रसूत झाली होती. त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. चौथे अपत्यही मुलगी झाल्याचे समजताच पूनम नैराश्यात गेली होती. नैराश्यातून तिने शनिवारी मध्यरात्री आपल्या नवजात मुलीचे नाक व तोंड दाबून तिला जीवे मारले.
घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना तातडीने कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृत बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पूनम शहाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून प्राथमिक चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पूनम शहा ही मूळची उत्तर प्रदेशातील असून तिचे सासर कोलकात्यात आहे. सध्या ती लोणीपाडा येथे आपल्या आईवडिलांकडे काही काळासाठी राहण्यासाठी आली होती.
या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.