जळगाव समाचार | १७ मे २०२५
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. अनेक भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अनुभव येत आहे. हा पाऊस 22 मेपर्यंत सुरू राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
बंगालच्या उपसागरातील पश्चिम भागात आणि आंध्र प्रदेशाच्या उत्तर किनारपट्टीवर हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती तयार झाली आहे. तसेच अरबी समुद्राच्या मध्यपूर्व व ईशान्य भागापासून ते दक्षिण गुजरात व उत्तर कोकणपर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे. यामुळेच राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे.
दरम्यान, मान्सूनही वेळेपेक्षा लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. अंदमान-निकोबार बेटांवर मान्सून नेहमीपेक्षा 10 दिवस आधीच दाखल झाला आहे. पोषक वातावरण असल्यामुळे मान्सूनची वाटचाल वेगाने होत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत तो अंदमान-निकोबार बेटांचा उर्वरित भाग, दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन आणि बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग व्यापेल.
ही स्थिती अशीच राहिल्यास, मान्सून 1 जूनपूर्वीच केरळात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

![]()




