जळगाव समाचार | २८ ऑगस्ट २०२५
मोनो रेल बंद पडल्यानंतर प्रवाशांची सुटका करण्यासाठी गाडीच्या काचा फोडाव्या लागलेल्या प्रकाराची एमएमआरडीएने गंभीर दखल घेतली आहे. प्राथमिक चौकशीत त्रुटी उघड झाल्याने सिग्नल व दूरसंचार विभागाचे मुख्य अभियंता मनीष सोनी आणि सुरक्षा व्यवस्थापक राजीव गिते यांना निलंबित करण्यात आले आहे.
१९ ऑगस्ट रोजी सायंकाळी वडाळा–चेंबूर मार्गावरील मोनो रेल मैसूर कॉलनी स्थानकाजवळ बंद पडली होती. दोन तास प्रवासी अडकून राहिले असून, अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली. या घटनेत गुदमरल्याने १६ प्रवाशांना त्रास झाला. त्यापैकी १३ जणांना घटनास्थळीच उपचार करून घरी सोडण्यात आले, तर तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने भविष्यातील सुरक्षा उपाययोजनांसाठी अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीत आयआयटी मुंबईचे प्रा. हिमांशु बहिरट, सिडकोच्या मुख्य ट्रान्सपोर्ट प्लॅनर गीता पिल्लई आणि एमएमआरडीएचे सह महानगर आयुक्त अस्तिक पांडे यांचा समावेश असून, ही समिती प्रतिबंधात्मक शिफारसी करणार आहे.

![]()




