जळगाव समाचार | १७ फेब्रुवारी २०२५
शनिवारी रात्री दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेदरम्यान रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) च्या महिला कॉन्स्टेबल रीना यांचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ड्यूटी बजावताना आपल्या छोट्या बाळाला कवेत घेऊन कार्यरत असलेल्या रीनांच्या या फोटोने अनेकांना भावूक केले आहे.
कर्तव्य आणि मातृत्व यांचा उत्तम समतोल
एका पत्रकाराने रीना यांचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत रीना आपल्या बाळाला बेल्टच्या मदतीने पोटाशी बांधून प्रवाशांना सतर्क करताना दिसत आहेत. त्यांच्या हातात पोलिसांची काठी असून त्या प्रवाशांना मदत करत आहेत. रेल्वे स्थानकावर गोंधळ होऊ नये म्हणून त्या कर्तव्य तत्परतेने आपले काम पार पाडत आहेत.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
रीना यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या कर्तव्यभावनेचे आणि मातृत्वाच्या जबाबदारीचे कौतुक केले आहे. आई आणि पोलीस कर्मचारी म्हणून त्यांचे समतोल राखणे अनेकांना प्रेरणादायी वाटत आहे.