जळगाव समाचार डेस्क;
राजधानी दिल्लीत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बाह्य दिल्लीतील मुंडका भागात एका महिलेने आपल्याच मुलीची गळा चिरून हत्या केली. आश्चर्यकारक बाब म्हणजे ती नवजात मुलगी होती. घटनेनंतर मुलीच्या वडिलांना हा प्रकार कळताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. या घटनेची माहिती वडिलांनी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेला ताब्यात घेतले. आपल्याला मुलगी नको होती, म्हणून तिने नवजात मुलीची हत्या केल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले.
वडिलांनी पोलिसात तक्रार केली
ही घटना गुरुवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. गोविंदा नावाच्या व्यक्तीने याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, त्याच्या पत्नीनेच त्यांच्या मुलीचा गळा चिरला आहे. पोलीस उपायुक्त (बाह्य) जिमी चिराम यांनी सांगितले की, मुंडका येथील टिकरी येथील बाबा हरिदास कॉलनीतील दाम्पत्याच्या घरी एक पथक पाठवण्यात आले. टीमला दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत नवजात मुलगी मृतावस्थेत आढळली, तर तिची आई दुसऱ्या खोलीत होती. चिराम यांनी एका निवेदनात म्हटले आहे, चौकशीदरम्यान महिलेने उघड केले की तिला मुलगी नको होती म्हणून तिने तिची हत्या केली.
पोलिसांनी महिलेला अटक केली
पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय, भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 103(1) अंतर्गत महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. कायदेशीर कारवाईनंतर महिलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. चिराम यांनी सांगितले की, महिलेचा पती हरियाणातील बहादूरगड येथे असलेल्या बुटांच्या कारखान्यात मजूर म्हणून काम करतो. या दाम्पत्याला सुमारे दोन वर्षांचा मुलगाही असल्याचे त्यांनी सांगितले.

![]()




