जळगाव समाचार | २९ ऑगस्ट २०२५
के.सी.ई. सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोदक मेकिंग प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत विविध फ्लेवर्सचे व आकर्षक आकारांचे मोदक सादर केले. यामध्ये दहावीचा विद्यार्थी प्रेम निलेश पाटील याने ज्वारीच्या उकडीपासून तयार केलेला नाविन्यपूर्ण मोदक सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. परीक्षकांकडून त्याच्या सर्जनशीलतेला आणि चवीला विशेष दाद मिळाली.
स्पर्धेत नववीची विद्यार्थिनी जान्हवी नेमाडे हिने पान फ्लेवरचा मोदक बनवून द्वितीय क्रमांक, तर दिशा पाटील हिने ओरिओ बिस्कीटचा मोदक बनवून तृतीय क्रमांक मिळवला. दुर्गेश वडनेरे व वैष्णवी भार्गव यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले. मोदक स्पेशालिस्ट सौ. सुनिता वागले यांनी परीक्षक म्हणून काम पाहत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका सौ. प्रणिता झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली असून, आयोजन श्री. चंद्रकांत कोळी यांनी केले. यशस्वीतेसाठी सौ. ज्योती पाचपांडे व सौ. रोशनी कोळी यांनी परिश्रम घेतले.