जळगाव समाचार | १० एप्रिल २०२५
शिवतीर्थ चौक ते स्टेडियम परिसरात मंगळवारी सायंकाळी अचानक डोळ्यांची चुरचुर व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही वेळ ही घटना वायुगतीमुळे झाली असल्याची अफवा पसरली. मात्र, पोलिसांच्या मॉकड्रिलमध्ये अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सरकारी कार्यालये आणि शाळा सुटत असताना हा प्रकार घडला. नागरिकांमध्ये खळबळ उडाली. लहान मुलांना उलट्या झाल्या, महिलांना डोळे उघडता येत नव्हते. घाबरून काही नागरिकांनी वाहने सोडून पळ काढला.
अग्निशमन दल आणि महापालिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. प्राथमिक तपासात, पोलिस ग्राउंडवर सुरू असलेल्या मॉकड्रिलदरम्यान अश्रुधुर सोडल्याने वाऱ्याच्या दिशेने तो परिसरात पसरल्याचे समोर आले आहे.
या प्रकारामुळे काही ज्येष्ठ नागरिकांना चक्कर आल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दमा आणि मधुमेहाचे रुग्णही त्रस्त झाले. एका डोळ्यांचे डॉक्टरही अश्रुधुरामुळे त्रासले, अशी माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार राजूमामा भोळे यांनी घटनास्थळी भेट दिली व प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. काही काळ परिसरातील वाहतूकही बंद करण्यात आली.
सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर धर्मेंद्र पाटील यांनी दिलेल्या सूचना :
• डोळ्यांत चुरचुर होत असल्यास चोळू नये
• थंड पाण्याने डोळे धुवावेत
• त्रास वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
• अशा परिस्थितीत प्रभावित भागात जाणे टाळावे
प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असून अधिकृत अहवाल प्रतीक्षेत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.