जळगाव समाचार | १८ डिसेंबर २०२५
महापालिकेच्या अंतिम मतदार यादीच्या प्रसिद्धीनंतर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून महापालिका निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. प्रभागनिहाय मतदारसंख्या स्पष्ट झाल्याने राजकीय पक्षांनी प्रत्यक्ष मैदानात कंबर कसली आहे. वरिष्ठ पातळीवर ‘महायुती’ आणि ‘महाविकास आघाडी’च्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच स्थानिक पातळीवर मात्र सर्वच पक्षांनी सर्व ७५ जागांवर उमेदवार देण्याची तयारी केल्याने राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत.
युतीच्या नावाखाली बाहेरून येणाऱ्या उमेदवारांना संधी दिली जाणार का, की गेली पाच वर्षे प्रभागात काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जाणार, या प्रश्नांनी इच्छुकांची चिंता वाढली आहे. मेहनत करूनही उमेदवारी नाकारली गेल्यास दोन्ही आघाड्यांमध्ये बंडखोरीचे सावट निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची मोठी भाऊगर्दी असून, मित्रपक्षीय समन्वयामुळे अनेकांची तयारी पाण्यात जाण्याची भीती आहे.
भाजप व शिंदे गट शिवसेनेने उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण करून प्राथमिक यादी तयार ठेवली आहे. अजित पवार गट सध्या युतीच्या अंतिम निर्णयाकडे लक्ष ठेवून आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट शिवसेनेत जागावाटपावरून मतभेद उफाळून आले आहेत. जळगाव महापालिकेत एकूण १९ प्रभाग असून ७५ सदस्य निवडले जाणार आहेत. मागील निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ५७ जागा मिळाल्या होत्या; मात्र त्यानंतर झालेल्या पक्षांतर्गत फूटीनंतर सत्तासमीकरणे बदलली होती.
यंदाच्या निवडणुकीत शहरातील रस्त्यांची दुरवस्था, मित्रपक्षांतील अंतर्गत स्पर्धा आणि गाळेधोरणाचा वाद हे मुद्दे निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. अनेक भागांत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून काही प्रभागांत वर्षभरातच रस्ते गायब झाल्याच्या तक्रारी आहेत. गाळेधोरणाचा प्रश्न आयुक्तांनी सोडवला असला तरी व्यापाऱ्यांचा विरोध कायम असून, मुख्यमंत्र्यांनी नवीन दराचा प्रस्ताव मागविण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, मतदारसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून यावेळी ४ लाख ३८ हजार ५२३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक अपक्ष किंवा अन्य पक्षांच्या वाटेवर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

![]()




