जळगाव समाचार | १ जानेवारी २०२६
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाली असून, ३१ डिसेंबर रोजी झालेल्या छाननीदरम्यान एका प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने भाजपाच्या माजी महापौर उज्ज्वला मोहन बेंडाळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. छाननीच्या दिवशी त्यांच्या विरोधात एकही वैध अर्ज नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपने महापालिकेत आपले खाते उघडले आहे. मात्र, अर्ज माघारीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
दरम्यान, शिवसेना (शिंदे गट)नेही माघारीच्या पहिल्याच दिवशी महापालिकेत आपली उपस्थिती नोंदवत खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक १८-अ मधून शिंदेसेनेचे उमेदवार गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड स्पष्ट झाली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
बुधवार, १ जानेवारीपासून अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू होताच मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे गौरव चंद्रकांत सोनवणे यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला. आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे पुत्र असलेल्या गौरव सोनवणेंच्या या विजयानिमित्ताने शिंदेसेनेने जळगाव महापालिकेत दमदार एन्ट्री केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

![]()




