जळगाव समाचार | ३० ऑगस्ट २०२५
शहरातील प्रसिद्ध मेहरूण तलावाच्या सुशोभीकरणासाठी मंजूर झालेला तब्बल १५ कोटींचा निधी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, यासाठी महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी जबाबदार असल्याचा थेट आरोप भाजप आमदार सुरेश भोळे यांनी केला आहे. “कमाई गोड लागल्याने आयुक्तांकडून कारवाई टाळली जात आहे,” असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी गेल्या वर्षी मेहरूण तलावात जल पर्यटन प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. त्यानुसार प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून १५ कोटींचा निधी मंजूर होऊन, ७५ लाख रुपयांचा पहिला टप्पा वितरित देखील झाला. मात्र, तलावातील पाणी प्रचंड दूषित झाल्याने कोट्यवधी खर्चूनही पर्यटकांना आकर्षित करण्याचे स्वप्न कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.
नागरी वस्त्यांतील तसेच उच्चभ्रू बंगल्यांमधील सांडपाणी थेट तलावात सोडले जात असल्याने पाण्याचा दर्जा मोठ्या प्रमाणात खालावला आहे. २०१७ मध्ये केलेल्या तपासणीत हे पाणी जीवजंतू व वनस्पतींसाठी घातक असल्याचे स्पष्ट झाले होते. अलीकडेच हजारो मासे दूषित पाण्यामुळे मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. प्रयोगशाळेच्या तपासणीनुसार तलावातील पाणी नाल्यातील पाण्यासारखेच असून ते मानवी आरोग्यासाठीही धोकादायक आहे.
महापालिकेवर थेट बोट
या गंभीर पार्श्वभूमीवर आमदार भोळे यांनी महापालिकेवर रोष व्यक्त करताना म्हटले,
“सांडपाणी थेट तलावात सोडणाऱ्या बंगल्यांना व इमारतींना परवानगी देऊ नये, अशी सूचना आयुक्तांना वारंवार पत्राद्वारे केली. मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून परवानग्या दिल्या. हाच सर्वात मोठा घोटाळा आहे. आम्हाला कारवाईचे अधिकार नाहीत, अन्यथा थेट भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली असती. पण आयुक्तांकडे अधिकार असूनही कमाई गोड लागल्याने कारवाई होत नाही.”
तलावातील गढूळपणा पाचपट वाढला असून ऑक्सिजनचे प्रमाण घटले आहे. परिणामी वनस्पतींची वाढ खुंटली असून अन्नसाखळी विस्कळीत होऊन जैवविविधतेलाच मोठा धोका निर्माण झाला आहे.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, १५ कोटींचा प्रकल्प भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकण्याची शक्यता वाढली आहे.