जळगाव समाचार | ५ एप्रिल २०२५
अल्प मानधनावर कार्य करणाऱ्या आशा, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सन्मानार्थ आमदार मंगेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण (अध्यक्ष – शिवनेरी फाउंडेशन) यांच्या पुढाकाराने चाळीसगाव तालुक्यातील १३ विवाहांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांचा आहेर देण्यात आला. एकूण ३ लाख २५ हजार रुपयांची ही आर्थिक मदत करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानात पार पडलेल्या कार्यक्रमात या विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार चव्हाण यांनी, “मी या सर्व सेविका आणि मदतनिसांचा भाऊ म्हणून नेहमी त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो. मागील चार वर्षांत मी १०४ भाचींच्या लग्नात एकूण २६ लाख रुपयांचा आहेर दिला आहे,” असे सांगितले.
या कार्यक्रमात आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्याची घोषणाही करण्यात आली. तसेच, या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या विवाहासाठी कमी खर्चात (४ ते ५ हजार रुपये) खडकी बु. येथे मंगल कार्यालय उपलब्ध करून देण्याची घोषणा शिवनेरी फाउंडेशनतर्फे करण्यात आली.
या प्रसंगी साहेबराव घोडे, देवयानी ठाकरे, पोपट भोळे, के. बी. साळुंखे, संजय पाटील, प्रा. सुनील निकम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता गावली यांनी केले, सूत्रसंचालन प्रदीप देसले यांनी तर आभार अॅड. सुलभा पवार यांनी मानले.