चाळीसगाव, जळगाव समाचार डेस्क;
नुकतीच लोकसभा (Loksabha) निवडणूक संपलेली आहे त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण हे काहींशी शांत झाक्याचे पहावयास मिळत होते. मात्र आज चाळीसगाव (Chalisgaon) शहरात आज थेट एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याकडून चक्क चाळीसगावचे भाजपचे आमदार आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांना पिस्तुलीने गोळी घालण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे चाळीसगावातील वातावरण उन्हाच्या उकाड्यासारखे गरम झाले आहे.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी महाविकास आघाडीतर्फे चाळीसगाव येथे शहर पोलिस ठाण्यासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान व्यासपीठावर त्याठिकाणी माजी व शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार उन्मेश पाटील, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या दरम्यान, या धरणे आंदोलनाच्या ठिकाणचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात टाकळी प्रचा गावाचे माजी सरपंच व महाविकास आघाडीचे नेते किसन जोर्वेकर याने आपल्या भाषणात आमदार मंगेश चव्हाण यांच्याविषयी बोलताना “माझ्या नादी लागशील तर पिस्तूलाने गोळी घालून मारून टाकेल रस्त्यावर” अशी जाहीर धमकी दिली. विशेष म्हणजे ही धमकी ज्याठिकाणी दिली त्या ठिकाणी समोरच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
संबंधित पदाधिकारी पिस्तुलीने मारण्याची भाषा करत असताना, व्यासपीठावरील कोणीच त्यांना थांबवले नाही. उलट सर्वजण त्यांना हसून दाद होते, असे आरोपही भाजपने केले आहे. महाविकास आघाडीच्या वतीने घेतलेले सदरचे धरणे आंदोलन हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी होते की फक्त आमदार मंगेश चव्हाण यांना विरोध म्हणून होते, असाही सवाल भाजपने उपस्थित केला आहे. तसेच गोळी घालण्याची भाषा करणाऱ्या पदाधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.