जळगाव समाचार डेस्क| ३० ऑगस्ट २०२४
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील डोहरी गावात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत मुलीच्या शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
सदर घटना चार दिवसांपूर्वी घडली. पीडित मुलगी शौचासाठी गावाबाहेरील केळीच्या बागेत गेली असता, आरोपी मुलाने तिचा पाठलाग करून तिच्यावर अत्याचार केला. घडलेल्या प्रकारामुळे धक्कादायक स्थिती निर्माण झाली. या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी जामनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली. गुरुवारी त्याला जामनेर न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्याचा आदेश दिला.
पोलिस उपनिरीक्षक दीपक रोठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, आरोपीच्या वागणुकीबाबत तपास करण्यात येत आहे. या घटनेमुळे डोहरी गावात मोठा संताप व्यक्त केला जात आहे. मुलींच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली असून, पोलिसांसमोर अशा घटनांना आळा घालण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.