जळगाव समाचार | १० ऑक्टोबर २०२५
मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय महामार्गावरील रक्षा ऑटो फ्युएल्स या पेट्रोल पंपावर गुरुवारी रात्री उशिरा पाच सशस्त्र दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली आणि एक लाखाहून अधिक रोकड रक्कम लुटून पसार झाले. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा हा पंप असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रकाश माळी आणि दीपक खोसे अशी जखमी कर्मचाऱ्यांची नावे असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनुसार, रात्री साडेअकराच्या सुमारास दोन दुचाकींवर पाच दरोडेखोर पंपावर आले. परिसर निर्जन असल्याचे लक्षात घेत त्यांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला. डोक्याला गावठी बंदूक लावून त्यांनी रोकड हिसकावली आणि कार्यालयातील संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही डीव्हीआरसह विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तोडफोड केली. दरोड्यानंतर आरोपी बोहर्डी गावाच्या दिशेने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आशिषकुमार अडसूळ पथकासह घटनास्थळी दाखल झाले. न्यायवैद्यक पथकाच्या मदतीने पुरावे गोळा करून पोलिसांनी संशयितांच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दहिवद येथेही अशाच प्रकारे पेट्रोल पंपावर दरोडा पडला होता. अल्पावधीत अशा दोन घटना घडल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मे महिन्यात चोपडा तालुक्यात हातेड येथेही दरोड्याचा प्रयत्न झाला होता, मात्र पोलिसांनी तो अयशस्वी केला होता. अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील सुरक्षाव्यवस्था आणि पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असून, अशा घटना रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी अधिक दक्षता घेण्याची मागणी होत आहे.