जळगाव समाचार डेस्क | ३१ ऑगस्ट २०२४
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात आपत्ती सौम्यीकरणासाठी 244 प्रकल्पांना 231.19 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या निधीला मंजुरी दिली असून, या कामांमुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी मोठी मदत होणार आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांतील आपत्ती सौम्यीकरण प्रस्तावांच्या मान्यतेसाठी आयोजित दूरदृष्य प्रणाली द्वारे घेण्यात आलेल्या प्रस्ताव मूल्यांकन समितीच्या बैठकीत मंत्री अनिल पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील 244 कामांना मान्यता दिली. या बैठकीत राज्यातील जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, सार्वजनिक पाटबंधारे विभागाचे अभियंता, तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील या मंजूर कामांमध्ये जळगाव महानगरपालिका हद्दीतील दोन संरक्षक भिंतींच्या बांधकामाचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जळगाव विभागासाठी 49 प्रकल्प, अमळनेर विभागासाठी 39 प्रकल्प, उत्तर विभागासाठी 21 प्रकल्प, तसेच सार्वजनिक पाटबंधारे मंडळ, जळगावसाठी 25 आर्च बंधारे आणि भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेसाठी 94 रिचार्ज शाफ्ट्स मंजूर करण्यात आले आहेत. निम्न तापी प्रकल्प विभाग, अमळनेरसाठी एक सिमेंट नाला आणि गॅबियन बंधारा देखील या निधीतून उभारले जाणार आहेत.
या कामांमुळे जिल्ह्यातील आपत्ती सौम्यीकरणाची क्षमता वाढणार असून, त्याचा मोठा फायदा स्थानिकांना होणार आहे. मंत्री अनिल पाटील यांनी या प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन कार्यक्षमता अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.