जळगाव समाचार | २० ऑगस्ट २०२५
शहरातील एमआयडीसी परिसरातील एच सेक्टर येथे देहविक्रीचा अवैध धंदा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बुधवारी सायंकाळी पोलिसांनी सापळा रचून धडक कारवाई केली. एच सेक्टरमधील ‘हॉटेल तारा’ येथे टाकलेल्या या छाप्यातून तीन महिलांची सुटका करण्यात आली असून, हॉटेलचा मालक व दोन ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या सूचनेनुसार मानव तस्करी प्रतिबंधक पथकाने (AHTU) केली. या मोहिमेत बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पाठविण्यात आला. ठरल्याप्रमाणे तो खोलीत गेल्यानंतर दिलेल्या गुप्त सिग्नलनुसार (लाईट दोन वेळा बंद व सुरू करून) पोलिसांना संकेत देण्यात आला. तत्काळ पथकाने छापा टाकत तिथून तीन महिलांची मुक्तता करण्यात आली.
सुटका करण्यात आलेल्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यासाठी समुपदेशन व पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हॉटेलमधील ही बेकायदेशीर गतिविधी थांबवण्यासाठी पोलिसांची ही निर्णायक धडक कारवाई ठरली आहे. हॉटेलचा मालक व अटक केलेल्या ग्राहकांची कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावीत व गृह उपअधीक्षक श्री. अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या धाडीत प्रभारी अधिकारी सौ. योगिता नारखेडे (प्रभारी अधिकारी, AHTU), पोलीस उपनिरीक्षक श्री. दिनेश बडगुजर, सहाय्यक फौजदार श्री. संजय हिवरकर, श्री. विठ्ठल फुसे, श्री. रवींद्र गायकवाड, सौ. निलिमा सुशीर, हवालदार श्री. दीपक पाटील, श्री. भूषण कोल्हे, सौ. मनीषा पाटील आणि सौ. वाहिदा तडवी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
सदर प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हॉटेल मालक व ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास वेगाने करण्यात येत आहे.