जळगाव समाचार | ४ मार्च २०२५
एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत दोन घरफोड्यांचा छडा लावत दोन चोरट्यांना अटक केली आहे. यात एका सराईत गुन्हेगारासह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. दोघांकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सावीत्रीनगर येथील सुरेश सोलंकी यांच्या घरात चोरट्यांनी कुलूप तोडून 1.6 लाखांचे चांदीचे दागिने आणि 40 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. यात विशाल दाभाडे (रा. रामेश्वर कॉलनी) आणि दिपक पाटील (रा. तांबापूर) या दोन आरोपींचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.
विशाल दाभाडे हा मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथे लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन त्याला अटक केली. त्याच्या चौकशीत दिपक पाटील मुक्ताईनगर येथे असल्याचे समजले. पोलिसांनी त्यालाही अटक करून चोरीस गेलेले 1.15 लाखांचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. विशाल दाभाडे याच्यावर जळगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांत 12 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
अल्पवयीन मुलाने केली घरफोडी
गणेशपुरी, मेहरुण येथे 22 फेब्रुवारी रोजी मोहसीन खान यांच्या घरातून 23,300 रुपये चोरीला गेले होते. पोलिसांनी तपास करून एका अल्पवयीन मुलाने ही चोरी केल्याचे उघड केले. त्याच्याकडून संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक राहुल तायडे आणि त्यांच्या पथकाने केली.