जळगाव समाचार डेस्क, २८ सप्टेंबर २०२४
म्हसावद ते नागदुली ३३ के.व्ही. लिंक लाईनच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री व पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते म्हसावद येथील वीज उपकेंद्रात संपन्न झाले. या कामामुळे म्हसावद व परिसरातील १९ गावांना अखंडित व योग्य दाबाने वीज पुरवठा होणार आहे. विशेषतः उन्हाळ्यातील विजेच्या लपंडावाला कायमस्वरूपी पूर्णविराम मिळणार आहे.
या उच्चदाब वाहिनीचे काम ५ किमी अंतराचे असून, १ कोटी २५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. हे काम पुढील तीन महिन्यांत पूर्ण होईल, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले. याशिवाय, सुमारे ८० कोटी रुपये खर्चून शिरसोली येथे १३२ के.व्ही. उपकेंद्र मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. या उपकेंद्रामुळे जळगाव शहर आणि ग्रामीण भागातील वीज पुरवठा अधिक सुरळीत होईल आणि उद्योगधंद्यांनाही फायदा होईल.
कार्यक्रमात अजय भोई यांची एस.आर.पी. कॉन्स्टेबल पदी नियुक्ती झाल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यामध्ये कार्यकारी अभियंता जयंत चोपडे, अति. कार्यकारी अभियंता गोपाळ महाजन, उप अभियंता विजय कपुरे, तसेच माजी सभापती नंदलाल पाटील व परिसरातील लोकप्रतिनिधी यांचा समावेश होता.
म्हसावद उपकेंद्र अंतर्गत म्हसावद, वावडदा, बोरनार, वाकडी, पाथरी, वडली, रामदेववाडी या १९ गावांना या लिंक लाईनमुळे अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा मिळेल, असेही यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच शितलताई चिंचोरे यांनी केले, तर आभार उप अभियंता विजय कपुरे यांनी मानले.